lang="en-US"> Suresh Dhas News | बीड जिल्ह्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमिनी हस्तांतरण प्रकरणात ७ आरोपपत्रे दाखल

Suresh Dhas News | बीड जिल्ह्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमिनी हस्तांतरण प्रकरणात ७ आरोपपत्रे दाखल, तपास अद्यापही सुरू!

Suresh Dhas News | औरंगाबाद: बीड जिल्ह्यातील अनेक मंदिर आणि मशिदीच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश धस आणि इतर आरोपींवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपपत्रे दाखल झाली आहेत, तर एक आरोपपत्र अद्याप दाखल करायचे बाकी आहे.

या प्रकरणाची सुरुवात राम खाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेद्वारे झाली. त्यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने सुरेश धस, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

सुरुवातीला आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून गुन्हा दाखल होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून टाकल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

तपासाला आतापर्यंत १६ महिने उलटून गेले तरीही तो संथ गतीने चालू आहे. यामुळे राम खाडे यांनी ॲड. नरसिंह जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तपास उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावा अशी मागणी केली आहे.

याचिकेची सुनावणी नुकतीच औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश स. पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांच्यासमोर झाली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला कळवले की, या प्रकरणात ७ आरोपपत्रे दाखल झाली आहेत आणि एक आरोपपत्र अद्याप दाखल करायचे बाकी आहे.

मुख्य सरकारी वकील ए. बी. गिरासे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी वेळ मागितला आणि न्यायालयाने पुढील सुनावणी ३ मे रोजी ठेवली आहे.

Exit mobile version